पूर्वग्रह, नांगर आणि चुकीचे गुंतवणूक निर्णय- अँकरिंग बायस

Image
  •    01 Sep 2023

आकलनात्मक पूर्वग्रह आपल्या सर्व प्रकारच्या निर्णयांमध्ये मोठी भूमिका बजावतात. आपल्याला अनेक प्रकारचे पूर्वग्रह असतात. दुसऱ्यांचे पूर्वग्रह सहजतेने जाणवतात पण स्वतःचे लक्षात येत नाहीत. आपल्याला पूर्वग्रह ठराविक पद्धतीने विचार करायला भाग पाडतात आणि बऱ्याचदा चुकीच्या गुंतवणूक  निर्णयांना पोहोचवतात

  • 'पूर्वग्रहदूषित विचार टाळायला हवेत' हे समजले तरी आपण  'आपले विचार पूर्वग्रहदूषित आहेत' हेच प्रथमतः मान्य करायला तयार नसतो. या पूर्वग्रहांमधला सर्वात लाडका पूर्वग्रह म्हणजे अँकरिंग बायस ! (Anchoring Bias) 

  • लोकांना जे ऐकायला आवडते तेच ते ऐकतात असे आपण अनुभवतो. एखाद्या व्यक्तीला आपण काश्मीरला फिरून आल्याची गोष्ट सांगत असताना ती व्यक्ती काश्मीरला दहशतवादी होते का? भारतीय सैन्य सगळीकडे होते का? असे प्रश्न विचारते.  माध्यमांमध्ये सतत येणाऱ्या बातम्यांमुळे असा समज झालेला आहे की काश्मीर म्हणजे फक्त दहशतवाद ! तुम्ही कुठल्या भागात गेला होता? खाण्याची व्यवस्था कशी होती? निसर्गसौंदर्याची माहिती, स्थानिक खाद्यपदार्थ, स्थानिक बाजारपेठांमधली खरेदी, सर्वसामान्य काश्मिरी लोकांशी झालेल्या गप्पा इ. विषयांमध्ये समोरच्या व्यक्तीला फारसा रस नसतो. त्याची गाडी दहशतवाद आणि भारतीय सैन्य या विषयांवरच अडकलेली असते.

  • सदर व्यक्ती काश्मीर बाबतची जी माहिती आधीच बाळगून आहे त्याच माहितीला तो एक प्रकारे तुमच्याकडून तपासून घेत बळकट करत असतो. इथे अँकरिंग बायस काम करत असतो. 

  • आपण अजून एक उदाहरण बघूया. ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या पोस्टस् या पारंपरिक आरोग्य सल्ला, कौटुंबिक संस्कार, भारतीय संस्कृती वि. पाश्चात्य संस्कृती, जुन्या आठवणी अशा विषयांशी संबंधित असतात. त्यात अनेक खोट्या बातम्या असतात. त्याच त्याच पोस्टस् दोन-तीन ग्रुप्स मधून आल्या की ज्येष्ठांना त्या सर्व पोस्टस् खऱ्या वाटायला लागतात. तुम्ही त्यांना पुराव्यासह खरी माहिती, खरी बातमी शोधून दाखवली किंवा 'फॅक्ट्स चेक' कशा करायच्या हे समजावले तरी बहुतेक आजोबा तुमच्यावर लवकर विश्वास ठेवत नाहीत. कारण त्यांना मिळालेली सुरुवातीची माहिती खोटी आहे हे ते मुळी मान्यच करायला तयार नसतात. त्यांच्या व्हर्जनवर ते कमालीचे ठाम असतात. 

अँकरिंग बायस कसा काम करतो?

  • आपला मेंदू विविध ठिकाणाहून  आलेल्या माहितीवर सतत काम करत असतो. पटकन निर्णय घेता यावा यासाठी मेंदू शॉर्टकट्स वापरतो. प्रचंड माहितीतील 'अत्यंत महत्त्वाची'  माहिती वापराचा एक पॅटर्न तयार होतो. पटकन निर्णय घेताना उपयोगी येणारे शॉर्टकट्स मेंदूत साठवले जातात आणि गरजेनुसार वापरले जातात. 

  • असे का होते यामागची एक भारी थेअरी शास्त्रज्ञांनी मांडली आहे. आदिमानव टोळ्या करून गुहेत राहत असत. शिकार करायला बाहेर पडल्यावर शिकार करणे किंवा कुठल्यातरी हिंस्त्र श्वापदाची शिकार होणे असे पर्याय त्याच्यापुढे असत. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये माणसाचा मेंदू क्षणभरात निर्णय घ्यायला पटाईत झाला. पॅटर्न आणि शॉर्टकट या दोन्हींमुळे त्वरित निर्णय घेणे सोपे होते आणि त्यामुळेच आपण अनेकदा जिवंत राहतो. मेंदूने वापरलेले काही शॉर्टकट्स मात्र जिथे गरज नाही तिथे पण विनाकारण वापरले जातात आणि आपले निर्णय चुकतात. 


अँकरिंग बायस का वापरला जातो?

  • आपल्याला माहित असलेल्या गोष्टींची पुष्टी झाली की छान वाटते, अहंकार सुखावतो. मीच कसा बरोबरच आहे याचा गर्व वाटतो. आपले चुकले आहे किंवा आपली माहिती अपुरी आहे हे सहजासहजी कुणी स्वीकारत नाही. अनेक वर्षांपासून असलेल्या समजुती, चुकीचे विचार बदलणे हे कमीपणाचे वाटते. 

  • अँकरिंग बायस मध्ये एखाद्या गोष्टीबाबत सुरुवातीलाच प्राप्त झालेल्या माहितीचा प्रभाव सहजासहजी दूर होत नाही. आपला मेंदू हा सुरुवातीच्या माहितीला घट्ट आवळून धरतो.  

  • अँकर म्हणजे जहाजाचा नांगर. जहाज पुढे जाऊ नये म्हणून प्रचंड वजनाचा नांगर पाण्यात सोडला जातो. जहाजाला हलू न देणे हे नांगराचे काम असते. 

  • जणू काही आपले मेंदूरुपी जहाज सुरुवातीला प्राप्त झालेल्या माहिती साठ्याला नांगर टाकून तिथेच निवांत थांबून राहते. त्याच विषयावरची नवीन माहिती, अनुभव मेंदू सहजा स्वीकारत नाही आणि पर्यायी गोष्टी सुद्धा लवकर समजून घेत नाही. 

  • अँकरिंग बायस मध्ये संदर्भ बिंदूंचा विचार करून निर्णय घेतला जातो. बऱ्याचदा चुकीचे संदर्भ बिंदू अर्धवट माहितीच्या आधारे निवडले जातात आणि निर्णय चुकतात.  

  • सफरचंद खरेदी करायला तुम्ही गेला असता एक किलोची किंमत बाबूलालने २०० रुपये व छबुलालने २२५ रुपये सांगितली असता छबुलाल २५ रुपयांनी महाग फळं विकतोय हे बाबुलाल कडून सुरुवातीला मिळालेल्या माहितीमुळेच लक्षात येते. इथे बाबुलालने सुरुवातीला सांगितलेली माहिती इथे आपला नांगर अडकवलेला आहे. 

गुंतवणूक व अँकरिंग बायस - 

  • या पूर्वग्रहामुळे गुंतवणूकदार सुरुवातीला त्यांना मिळालेल्या माहितीवर आधारित निर्णय घेतात तसेच त्यांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत ताजी माहिती म्हणजे नुकतीच मिळालेली माहिती मोठी भूमिका बजावत असते. या संदर्भात आपण काही उदाहरणे बघूया 

  • उदाहरण १ - अनिकेत 'मेहनत व कष्ट' या दोन समान अर्थाच्या शब्दांवर आलटून पालटून प्रेम करणारा माणूस आहे. उत्तम पगाराची  नोकरी सोडून चहा-स्नॅक्सचे छोटे हॉटेल त्याने सुरू केले. हा निर्णय त्याने अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतला होता. ग्राहकांना उत्कृष्ट चवीचे खाद्यपदार्थ वाजवी दरात देण्याचा प्रयत्न तो करत होता. परंतु त्याला अपेक्षित विक्री व नफा व्यवसाय सुरू करून बरेच महिने झाले तरी मिळत नव्हता. युट्यूबवर भरपूर प्रेरणादायी व्हिडिओ बघुन त्याने अजून जास्त मेहनत घेण्याचा चंग बांधला. खाद्यपदार्थ बनवणारे आचारी, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर, मदतनीस अशा सर्व कर्मचाऱ्यांना अधिक कठोर मेहनत घ्यायचा आदेश दिला गेला. असेच पुन्हा काही महिने गेल्यावर सकारात्मक परिणाम दिसत नव्हते. त्याने प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक शेट्टी काकांचा सल्ला घेतला, तेव्हा वेगळेच चित्र त्याच्यासमोर आले. 

  • शेट्टी काका म्हणाले की तुमच्या हॉटेलची जागा मुख्य बाजारपेठेपेक्षा आडबाजूला आहे, तुमचे उत्कृष्ट खाद्यपदार्थ लोकांना समजण्यासाठी डिजिटल माध्यमातून चांगली जाहिरात करणे आवश्यक आहे, तुमच्या हॉटेलमध्ये तुमच्या तुमच्यातच कितीही मेहनत घेतली तरी योग्य ठिकाणची जागा व आकर्षक जाहिरातीशिवाय हॉटेलची विक्री व पर्यायाने नफा वाढणार नाही. 

  • अनिकेतची निष्ठा यात्रा चुकीच्या दिशेला जात होती हे त्याच्या लक्षात आले. इथे 'फक्त कठोर मेहनतीच्या जोरावर सर्व संकटे पार करू' हा त्याचा अँकरिंग बायस होता. व्यवसाय व गुंतवणूक करतांना अनेक गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ठराविक गोष्टी खूप श्रध्देने केल्या आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत.

  • उदाहरण २ - शेअर बाजाराबाबतच्या बातम्या बहुतेकवेळा अतिरंजीत पद्धतीने दाखवल्या जातात. हॅपिएस्ट माईंड्स टेक्नॉलॉजी लिमिटेड या  कंपनीचा आयपीओ सप्टेंबर  २०२० मध्ये बाजारात आला होता. तेव्हा आयपीओ द्वारे शेअर खरेदी करण्याची किंमत १६५ रुपये प्रति शेअर अशी कंपनीने ठरवली होती. बाजारात नोंदणीच्या दिवशी प्रति शेअर रू. ३६५ प्रमाणे कंपनीचे जोरदार स्वागत झाले होते. आपण असे समजू की तुम्ही आयपीओला अर्ज केला आणि तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत.

  • पर्याय क्र.१ - तुमच्या दृष्टीने शेअर किमतीचा नांगर १६५ रुपये या सुरुवातीच्या किंमतीला अडकलेला आहे. “हॅपिएस्ट माईंड्स कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल, त्यांनी कमावले एका दिवसात दुप्पट पैसे!” अशी बातमी तुम्ही या कंपनीच्या लिस्टिंग नंतर लगेच वाचली असती तर तुम्ही नक्कीच प्रभावीत झाला असता. तुम्ही त्याच दिवशी नफा कमवण्यासाठी तुमचे सर्व शेअर्स विकले असते तर तुमचाही दुप्पट फायदा झाला असता.  

  • पर्याय क्र. २ - तुम्ही शेअर्समध्ये अभ्यासपूर्वक दीर्घकालीन गुंतवणूक करणारे हुशार व मुरब्बी गुंतवणूकदार असाल तर रू. १६५ किंवा रू. ३६० किंवा रू.५०० अशा कुठल्याही किमतींना तुम्ही तुमचा नांगर अडकू देणार नाहीत. कंपनीचे आर्थिक निकाल, भविष्यातील व्यवसाय वाढीच्या संधी, विश्वासू व्यवस्थापन अशा मूलभूत गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला असणार. 

  • १८ ऑगस्ट २०२२ रोजी १११५ रुपयांना हा शेअर व्यवहार करत होता. 

  • वरील दोन्ही पर्यायांमध्ये तुमचा संदर्भबिंदू काय होता हे महत्वाचे आहे. एखाद्या बातमीने प्रभावित होऊन चांगल्या शेअरमध्ये सहा पट फायदा कमवण्याची संधी गमवायची की नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. 

  • उदाहरण ३ - शेअर्स खरेदी करताना ५२ आठवड्यातील सर्वात जास्त व सर्वात कमी बाजारभाव गुंतवणूकदारांकडून तपासला जातो. एखाद्या कंपनीचा शेअर गेल्या वर्षभरात सर्वात कमी किंमतीला उपलब्ध असेल तर तो स्वस्त झाला असे वाटू शकते. तुम्ही ५२ आठवड्यातील सर्वात जास्त किमतीशी तुलना करत असल्याने शेअर स्वस्त वाटतो पण तसा तो खरोखर स्वस्त असतोच असे नाही. 

  • सर्वोच्च पातळीपासून भाव कोसळण्याची अनेक कारणे संभवतात. पुन्हा तो शेअर सर्वोच्च पातळी गाठेलच असा सोयीस्कर समज गुंतवणूकदार करून घेतात. इथे ५२ आठवड्यातील सर्वात जास्त भाव हा तुमचा संदर्भ बिंदू म्हणजेच अँकर आहे हे लक्षात घ्या. 

  • येस बँकेचा गेल्या पाच वर्षांच्या शेअर किमतीचा तक्ता आपण अभ्यासू - 

  • सुरुवातीच्या काळात कंपनीचा शेअर चांगल्या आर्थिक निकालांमुळे नेहमी उच्च पातळी गाठत होता. वित्तीय अनियमितता आणि अफरातफर समोर आल्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये रू. ४०६ प्रति शेअर असणारा हा शेअर रू. ५.५५  प्रति शेअरपर्यंत काही महिन्यात खाली आला होता.

  • या दरम्यानच्या काळात अनेक हौशी लोकांनी ४०० रुपयांना काही काळापूर्वी असणारा शेअर फक्त ४० रुपयांना किंवा अशा कमी किमतीला उपलब्ध झाला म्हणून खरेदी केला. पुढे बातम्या जशा येत गेल्या तसाच शेअर पुन्हा कोसळला आणि १२ रुपयांच्या आसपास स्थिरावला. 

  • ज्यांची खरेदी रू. ४०० होती त्यांचे हा शेअर ४० रुपयांना आला असता गुंतवणूक रकमेचे ९०% नुकसान झाले होते. ज्यांची खरेदी रू. ४० होती त्यांचे हा शेअर रू. १० ला आला असता गुंतवणूक रकमेचे  ७५% नुकसान झाले होते.  ज्यांची खरेदी रू. ४०० होती त्यांचे हा शेअर १० रुपयांना आला असता गुंतवणूक रकमेचे जवळपास ९७.५ % नुकसान झाले होते. 

  • Don't catch falling knife! असे शेअर्स गुंतवणूकीबाबत तज्ज्ञ नेहमी सांगतात. रिझर्व बँक, सीबीआय, ईडी अशा सर्व तपास यंत्रणांमार्फत येस बँकेच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले जात होते व येस बँकेत गडबड आहे हे विविध माध्यमे इत्यंभूतपणे समोर आणत होती. परंतु, या सगळ्या माहितीकडे दुर्लक्ष करून लोकांनी आपला ४०० रुपयांना अडकवलेला नांगर काही हलवला नाही आणि सोईस्कर विचार केला की येस बँकेसारखी मोठी बँक सरकार कधीच गाळात जाऊ देणार नाही. ते काहीतरी करतील आणि मी रू.४० किंवा रू.१२ ला घेतलेला शेअर पुन्हा रू. ४०० ही सर्वोच्च पातळी लवकरच गाठेल. 

  • गेल्या महिन्यांत येस बँकेबाबत काही सकारात्मक बातम्या येत असल्या तरी हा शेअर रू.४००पर्यंत कधी जाईल हे साक्षात ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही.

अँकरिंग बायस कसा टाळावा? अँकरिंग बायसने आपले भावविश्व व्यापलेले आहे. त्यातून १००% सुटका करून घेणे खूप कठीण असू शकते. किमान मोठे निर्णय घेतांना काय काळजी घ्यायला हवी ते आपण “नांगर” या शब्दातूनच समजून घेऊया -

  1. नां  - नाही म्हणायला शिका. 

  2. ग   - ‘ग’ ची बाधा नको. 

  3. र   - रमू नका. रागावू नका. 

१.  नां - नाही म्हणायला शिका - 

  • नवीन रंजक माहितीच्या कायमचे प्रेमात पडणे टाळायला हवे. विषय समजून घेतल्यावर साधक-बाधक अशा दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा.  

  • “Be fearful when others are greedy, and greedy when others are fearful.” असे विचार वारेन बफेंनी त्यांच्या भाषणात अनेकदा मांडले आहेत. 

  • जेव्हा सर्वचजण नजीकच्या भविष्यात स्थावर मालमत्तेच्या किंमतीत होणारी जबरी भाववाढ किंवा पटींत वाढू शकणारे एखाद्या कंपनीचे शेअर्स यांबाबत हुरळून जात असतील तर तुम्ही मनात मात्र या उन्मादाला “नाही” म्हणायला हवे.

  • टीव्हीवर येणारे एक्सपर्ट्स, ब्लॉगर्स, इन्फ्लुएन्सर्स त्यांना ज्या विषयातून जास्त जाहिरात उत्पन्न व प्रसिद्धी मिळेल त्या विषयांवर मत मांडतात. या लोकांनी केलेल्या भाकीतांची तपासणी करायला कोणाला वेळ नसतो. त्यामुळे आक्रमकपणे भरपूर परतावा देण्याचे दावे करणाऱ्या सर्व प्रकारच्या माहितीला व जाहिरातींना "नाही" म्हणा. 



२. ग - “ग” ची बाधा नको - 

  • तुमच्या परिचयात असे काही लोक असतील की त्यांच्याबरोबर एखादी गोष्ट बोलायला सुरुवात केल्यावर ते “मला हे माहिती आहे” असे फटकन बोलून तुम्हाला गप्प करतात. तुम्ही मग सांगता की अहो आधी ऐकून तर घ्या, पण ते त्यांचे पालुपद काही सोडत नाहीत. 

  • असा शहाणपणा आपण पण अनेक गोष्टींबाबत करत असतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची असलेली माहिती कितपत खरी व परिपूर्ण आहे हे सतत तपासायला हवे. 

  • "अर्थसाक्षर होणे" हे एकदाच करायचे काम नसून ती एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. "आपली मते पूर्वग्रहदूषित तर नाही ना?" हा विचार करायला हवा. मोठे आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.


३. र - रमू नका. रागावू नका. - 

  • अनेक गोष्टी आपण कळत-नकळतपणे आवडून घेत असतो. भविष्य कितीही उज्वल वाटत असले तरी ३ ते ६ महिने खर्चाला पुरेल इतका इमर्जन्सी फ़ंड आपल्याकडे असावा असे अर्थ नियोजन सल्लागार सांगतात. 

  • त्यांच्याकडे दुर्लक्ष करत तुफान खर्च केला जातो. कोरोना लॉकडाऊन सारखी बिकट आर्थिक परिस्थिती उद्भवली की रागवायला होते. हे सर्व टाळण्यासाठी दिवास्वप्ने बघू नका आणि गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत तर आपली जुनीच माहिती कशी बरोबर होती यावर आडून बसू नका. 


समारोप - स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात सांगितली आहेत.

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः। वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥    (२-५६)

ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे अशा व्यक्तीला  स्थितप्रज्ञ संबोधतात. अशा माणसाला कोणतीही आशा, अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुखदुःख यांमुळे त्याला आनंद किंवा उद्वेग होत नाही. 

सर्वसामान्य संसारी माणसाला अचानक असे स्थितप्रज्ञ वगैरे होणे शक्य नाही परंतु मोठे आर्थिक निर्णय घेतांना तरी फार उत्तेजित होऊन निर्णय घ्यायला नको हे लक्षात ठेवले तरी पुष्कळ आहे!  

  • सीए अभिजीत कोळपकर - “अर्थसाक्षर व्हा!” या  बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत

[लेखातील कंपन्यांची नावे केवळ  उदाहरण म्हणून दिलेली आहेत. त्यांचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानेच करावी]