स्वतःला जास्त शहाणा आणि इतरांना वेडा ठरवणारा सेल्फ सर्व्हिंग बायस !

Image
  •    01 Sep 2023

आकलनात्मक पूर्वग्रह आपले निर्णय चुकवतात. पूर्वग्रहदूषित विचारांचा आर्थिक निर्णयांवर विपरीत परिणाम न होऊ देण्याची काळजी शहाण्या माणसांनी घ्यायला हवी.

आपल्याला आधीच असलेल्या माहितीनुसार सोयीस्करपणे अर्थ लावण्याच्या गैरसमजाला पुष्टीकरणात्मक पूर्वग्रह (Confirmation Bias) म्हणतात. याच गैरसमजाची पुढची पायरी म्हणजे सेल्फ सर्व्हिंग बायस ! 


गुंतवणुकीतील आपल्या यशाचे श्रेय तर वाजत गाजत घ्यायचे पण अपयश आल्यास ते मात्र इतरांमुळे आले किंवा नियंत्रणात नसलेल्या बाह्य गोष्टींवर ढकलून द्यायचे ही प्रवृत्ती सेल्फ सर्व्हिंग बायसमध्ये असते. कदाचित यामुळेच 'यशाचे हजार बाप असतात पण अपयश पोरके असते' ही म्हण रूढ झाली असावी. 


"माझ्या बाबतीत काही चांगले झाले तर माझे भरभरून कौतुक करा पण काही चुकीचे किंवा नकारात्मक झाले तर दोष इतरांचा किंवा नशिबाचा असतो!" असे यामुळे व्यक्तीचे वागणे असते. 


सेल्फ सर्व्हिंग बायसने पछाडलेले लोक कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेण्यात आणि काही वेळा इतरांचे श्रेय लाटण्यातही आघाडीवर असतात. “आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट..” हे शाहरुख खानचे प्रसिद्ध गाणे   त्यांच्या डोक्यात सतत सुरु असते. आत्मविश्वास असायलाच हवा पण अतीआत्मविश्वास नको.   


याबाबत आपण काही उदाहरणे बघूया - 

  1. परीक्षेत चांगले गुण प्राप्त झाले तर मी खूप हुशार आहे, पहाटे उठून मी छान अभ्यास केला होता, मला चांगले गुण प्राप्त होणे ही एक सहाजिकच अशी गोष्ट आहे असा विचार करून विद्यार्थी हुरळून जातो. पण या उलट परिस्थिती असेल तर शिक्षकांनी मला मुद्दाम कमी गुण दिले किंवा या विषयाचा अभ्यास करायला मला वेळच मिळाला नव्हता किंवा मी शिकवणी लावली नव्हती अशी कारणे दिली जातात.

  2. नोकरीसाठी मुलाखत दिल्यावर दोन निष्पत्ती असतात. नोकरी मिळणे किंवा संधी न मिळणे. 

    • नोकरी मिळाल्यास उमेदवार स्वतःविषयी खुश होतो आणि विचार करतो की या पदासाठी मीच एक कसा सर्वगुणसंपन्न, अनेक लोकांपैकी एक महान व्यक्ती आहे. मी मुलाखत घेणाऱ्यांवर माझ्या प्रभावी व्यक्तिमत्वाने अशी काही छाप पाडली की त्यांना मला निवडण्याशिवाय पर्यायच शिल्लक ठेवला नाही इ.  

    • नोकरीची संधी न मिळाल्यास उमेदवार विचार करतो की मुलाखत घेणारे पक्षपाती होते, त्यांना मला समजूनच घेता आले नाही किंवा मला मुद्दाम अवघड प्रश्न विचारले गेले किंवा ओळखीच्या उमेदवाराची आधीच निवड झाली होती आणि मुलाखत फक्त दाखवायला घेतली गेली इ.

  3. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत सेल्फ सर्व्हिंग बायसने विचार करणारे लोक कशी प्रतिक्रिया देतात ते आपण बघू. 

    • शेअर बाजारातून उत्कृष्ट परतावा मिळाल्यास ते प्रौढी मिरवतात की उत्तम कंपन्या निवडण्यासाठी जे काही हवे ते सगळे माझ्याकडे उपजतच आहे, माझा चांगल्या कंपन्यांचा इतका सखोल अभ्यास आहे की म्युच्युअल फ़ंड कंपन्यांचे मोठे मोठे मॅनेजर्स माझ्यापुढे फिके आहेत, मी इतका हुशार आहे की ज्या कंपनीच्या शेअरला हात लावतो त्याचे सोने होते इ.

    • शेअर्स गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास गुंतवणूकदार दोष देतांना नानाविध घटक शोधतात. यामध्ये केंद्र सरकारची सदोष धोरणे, जागतिक मंदी, जगात कुठेही सुरु असलेले युद्ध, नैसर्गिक आपत्ती यांबरोबरच शेअर बाजारात मी नवीनच आहे, सामान्य माणूस शेअर बाजारातून पैसे मिळवू शकत नाही, माझी ग्रहदशा सध्या खराब होती, माझ्या नशिबात शेअर्समधून पैसे मिळण्याचा योग  दिसत नाही, माझ्या डिमॅट अकाउंटचा नंबर भाग्यांकाशी जुळत नाही अशी अनेक कारणे देतात. यातील बऱ्याच गोष्टी हास्यास्पद असल्या तरी त्यांवर कमी परतावा मिळालेल्या गुंतवणूकदाराची प्रगाढ श्रद्धा असते.  


सेल्फ सर्व्हिंग बायस मुळे गोष्टी आहे तश्या समजून न घेता आपल्याला हव्या तश्या बघायचा प्रयत्न केला जातो. आपल्या अपयशाची कारणमीमांसा करताना स्वतःला पूर्णपणे वगळतो.  'दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही' म्हणजे दुसऱ्यांच्या किरकोळ चुका आपल्याला लगेच दिसतात पण स्वतःचे मोठ्ठे दोष न स्वीकारता त्यांचे हिरीरीने समर्थन केले जाते. 


इतके साधे लोकांच्या कसे लक्षात येत नाही हे तुम्हाला वाटत असेल तर त्यामागचे कारण आपण समजून घेऊया -

  • ‘स्वतःच्या चुका स्वीकारणे म्हणजे माझी अकार्यक्षमता मान्य करणे' किंवा 'आपली क्षमता कमी आहे आहे’ असा इतर लोक विचार करतील का काय? याची भीती तुम्हाला वाटते. यामुळे आत्मसन्मान जपण्यासाठी आपली चूक न स्विकारता नियंत्रणात नसलेल्या इतर कोणत्याही गोष्टीवर चूक लगेच थोपवली जाते. 

  • कृपया लक्षात घ्या, इथे खोटा आत्मसन्मान जपण्यात २ गोष्टी अंतर्भूत आहेत -

  1. चूक स्वीकारली नाही म्हणजे आपण भारी आहोत ही भावना आपल्याला सुखावते. कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक विचार कसे करावेत हे “सेल्फ-हेल्प साहित्य” शिकवते. आत्मविश्वासाला तडा जाऊ नये म्हणून चूकाच स्वीकारायच्या नाहीत अशी सोयीस्कर समजूत अनेकांनी यातून करून घेतली आहे. 

  1. चूक दुसऱ्याच्या माथी मारली की आपली अपराधी भावनेतून सुटका होते.   

  • या सर्व प्रक्रियेत मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते, आपल्यात सुधारणा न केल्याने निर्णय चुकतात. 

स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक आणि सेल्फ सर्व्हिंग बायस - 

मोहनरावांनी पै-पै साठवून 1990 मध्ये पहिले घर घेतले होते. 2003 साली  निवृत्तीनंतर मिळालेले पैसेसुद्धा त्यांनी घरातच गुंतवले. त्यांच्या या दोन्ही घरांचा बाजारभाव आता काही पटींत आहे. मोहनरावांचा मुलगा रमणने 2017 मध्ये गुंतवणूक म्हणून नवीन सदनिका विकत घेतली. रमणच्या घरातील या गुंतवणुकीचे मूल्य 2022 साल उजाडले तरी फारसे काही वाढले नाही.

मोहनराव रमणवर त्याने व्यवस्थित घर निवडले नाही म्हणून नाराज आहेत. ते कसे बरोबर होते आणि तो कसा चुकला यावरून दोघांमध्ये नेहमी वादविवाद होतात. इथे मोहनराव सेल्फ सर्व्हिंग बायसमुळे रमणला दोषी कसे ठरवत आहेत हे आपण समजून घेऊया. 

मोहनरावांनी घरे खरेदी केली त्या काळात ज्यांनी कोणी घरे विकत घेतली त्या बहुतेक सर्वच लोकांच्या घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. कायदेशीर कटकटीत न अडकता उत्तम लोकेशनची सुंदर घरे निवडणे याबाबत त्यांचे कौतुक आहेच पण तोच नियम बिचाऱ्या रमणला लागू होत नाही. 2017 सालची नोटबंदी, रेरा कायदा, जीएसटी, गुंतवणूक म्हणून शेअर्स आणि म्युच्युअल फ़ंडांची वाढलेली लोकप्रियता यांसारख्या अनेक कारणांनी घरांच्या किमती गेल्या काही वर्षांत फारश्या वाढल्या नाहीत. या गोष्टी रमणच्या नियंत्रणात नव्हत्या. मोहनरावांनी मी कसा बरोबर होतो आणि रमण कसा चूक आहे हे ठरवताना दोघांच्या गुंतवणुक निर्णयाच्या काळात झालेले बदल समजून घ्यायला हवे होते. 

कोव्हीडकाळ - रंकाचे राव आणि रावांचे पुन्हा झालेले रंक ! 

  • कोव्हीडने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केल्यावर केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केली आणि टप्प्याटप्प्याने पुन्हा वाढवली. या काळात कंपन्या नफा मिळवू शकणार नाहीत आणि तोटा किती होईल याबाबत भयंकर गोंधळाची स्थिती होती. शेअर बाजार नेहमी टोकाची प्रतिक्रिया देत असतात त्यामुळे दि. 21 मार्च 2020 ते 30 एप्रिल 2020 या काळात जगभरातले शेअर बाजार कोसळले. सेन्सेक्स 26,000 च्याही खाली गेला होता. 

  • कोव्हीडवर नक्की औषध काय घ्यायचे, लस कधी येणार, उपाययोजना कोणत्या करायच्या हे अनिश्चित होते. टाळेबंदी आणि महामारीने निर्माण झालेल्या हाहाकाराने जागतिक व्यापाऱ्याचे चक्र थांबले होते. कोट्यवधी लोक देशोधडीला लागले होते. नोकरी नाही तर बँकांचे कर्ज फेडायची कशी आणि घरखर्च करायचा कसा? यावर उत्तर म्हणून श्रीमंत देशांनी त्यांच्या नागरिकांना रोख मदत दिली. लोकांच्या हातात खर्चासाठी पैसे उपलब्ध करून द्यायचे म्हणून जगभरातील सरकारे आणि मध्यवर्ती बँकांनी बाजारात भरपूर पैसे राहतील अशो धोरणे आखली. 

  • अचानक उपलब्ध झालेला हा पैसा शेअर बाजारात आला आणि बाजार वेगाने वाढायला सुरुवात झाली. 

  • दरम्यानच्या काळात घरी बसून काय करायचे म्हणून अनेकांनी युट्युबवर शेअर बाजारासंबंधी व्हिडीओ बघितले, पुस्तके वाचली, ऑनलाईन क्लासेस घेतले आणि शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करायला सुरुवात केली. 

  • भारतात पुढच्या 2 वर्षांमध्ये लाखो  नवीन डिमॅट अकाउंट उघडले गेले. आपण विकत घेतलेल्या शेअर्सच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत हे या नवगुंतवणूकदारांना सुखावणारे होते. नेहमीची नोकरी किंवा व्यवसाय करण्यापेक्षा शेअर ट्रेडिंग करून जास्त पैसे मिळवू असे अनेकांना वाटत होते. 

  • ऑक्टोबर 2020 पर्यंत बाजाराने सर्वोच्च पातळी गाठली होती. रशियाने युक्रेन बरोबर युद्ध फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू केले. कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढायला सुरुवात झाली. चीनमध्ये कोरोना वाढल्याने त्यांच्याकडे लादलेली कडकडीत टाळेबंदी, युद्ध, रशियावरच्या विविध निर्बंध यांसारख्या कारणांमुळे वस्तूंची जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली. कोव्हीड काळात बाजारात उपलब्ध झालेल्या स्वस्त पैशामुळे वस्तू व सेवांचे भाव वाढत गेले. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवायचा निर्णय घेतला. शेअर बाजारात अस्थीरता आली. 

  • कोव्हीड काळात गुंतवणुकीवर मिळालेला उत्कृष्ट परतावा पुढील काळात नवीन गुंतवणूकदारांना मिळाला नाही. 

  • प्रसिद्ध लेखक आणि अर्थ अभ्यासक रॉन चेरनॉ यांचे एक प्रसिध्द वचन येथे लागू होते -  As a bull market continues, almost anything you buy goes up. It makes you feel that investing in stocks is a very easy and safe and that you're a financial genius ! 

  • कावळा बसायला आणि फांदी तुटायला जशी एक वेळ होते तसे या कोविड काळातील नवगुंतवणूकदारांचे झाले होते. सुरुवातीच्या यशाचे श्रेय अनेकांनी स्वतःकडे घेतले तर नंतरच्या नुकसानीचे किंवा कमी परताव्याचे कारण त्यांनी सोयीस्करपणे जागतिक परिस्थिती हे ठरवले. हाच तो सेल्फ सर्व्हिंग बायस! 

सेल्फ सर्व्हिंग बायस पासून वाचण्यासाठी तुम्ही काय करावे ? 


  1. प्रामाणिक आत्मपरीक्षण करून चुका स्वीकारा. चुकांमधून शिकणे आणि पुन्हा त्याच त्याच चुका न करणे हे महान लोकांच्या यशाचे गुपित असते. डोळसपणे  चुका स्वीकारल्यास सुधारणा कुठल्या क्षेत्रात करायची आहे यावर लक्ष केंद्रित केले जाते आणि प्रगतीचा मार्गावर तुमची वाटचाल सुरू होते. 


  1. तथ्य-शोधक व्हा ! निर्णय घेताना तुम्ही तथ्यांना महत्व देता की भावनात्मक मुद्दे वास्तवापेक्षा वरचढ ठरतात यावर गंभीरपणे विचार करायला हवा. तर्कशुद्ध निर्णय घेणे सोपे जरी नसले तरी सेल्फ सर्व्हिंग बायस सारख्या बहुतेक पूर्वग्रहांपासून बचाव करण्याचा तथ्यांधारित निर्णय घेणे हा सोपा उपाय आहे. 


  1. सदैव आशावादी असायलाच हवे पण सावधानता आवश्यक आहे. भविष्य उज्ज्वल आहे यावर प्रगाढ श्रद्धा ठेवून फक्त सकारात्मक गोष्टी घडतील आणि नकारात्मक काहीच होऊ शकणार नाही असा विचार करणे म्हणजे एकप्रकारे स्वतःला फसवणे ठरते. आर्थिक तोटा, नुकसान झाल्यास पुढे आपोआप सकारात्मक गोष्टी घडून नुकसान भरून येईल असा विचार टाळायला हवा. आपली काय चूक झाली हे तपासा आणि पुन्हा असे घडणार नाही यासाठी  उपाययोजना करा. 


  1. यशात नशिबाचा वाटा असू शकतो हे स्वीकारा. गुंतवणुकीतून खूप पैसे मिळवले म्हणजे 'बन चुके' मोड मध्ये अनेक लोक जातात, स्वतः ला गुंतवणूक गुरु समजायला लागतात. आपले ज्ञान परिपूर्ण आहे असे त्यांना वाटते. परंतु आपल्या यशात थोडाफार भाग नशीबाचा असू शकतो ही जाणीव आवश्यक आहे. इतिहासातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाणारे आणि जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत गेली कित्येक दशके शीर्षस्थानी असणारे वॉरेन बफे सुद्धा त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते सांगतात -  “I’m just lucky to have been in the right place at the right time. Another place, another time, I wouldn’t have been as successful. Society enabled me to make my money and my money should go to society.” 



सीए अभिजीत कोळपकर - “अर्थसाक्षर व्हा!” या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत