बुडीत खर्चरुपी भ्रमाचा भोपळा आणि तुमचे आर्थिक निर्णय !
“Winners quit fast, quit often, and quit without guilt !”- Seth Godin
“नेहमी सकारात्मक विचारसरणी अंगी बाळगा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कधीही हार मानू नका. कितीही वेळा अपयश आले तरी अंतिम विजय तुमचाच आहे यावर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्नशील राहा..” असे विचार प्रेरणादायी पुस्तके, व्याख्याने आणि प्रशिक्षणात मांडले जातात. यशासाठी सातत्याने केलेले फक्त प्रयत्नच बऱ्याचदा फलदायी होत नाहीत. प्रयत्नांची दिशा सुरुवातीलाच चुकली किंवा तुमच्या नियंत्रणात नसलेल्या बाह्य परिस्थितीत बदल झालेत तर आपले प्रयत्न थांबवायला हवेत. परंतु असे आपण करत नाहीत. सतत ध्येयांमागे धावतांना आपण चुकत तर नाही ना? हा विचार केला जात नाही. असे काही प्रसंग आपण बघूया -
महाग दराचे तिकीट विकत घेऊन तुम्ही प्रसिद्ध हिरोचा सिनेमा बघायला चित्रपटगृहात जाता. तुम्हाला सर्दीने बेजार झाल्याने तिथल्या एसीचा भयंकर त्रास होत असतो. सिनेमा नेमका सुमार दर्जाचा असल्याने त्यातही लक्ष लागत नाही. आपण घरी जायला हवे हे पहिल्या पाऊण तासातच तुमच्या लक्षात येते परंतु तिकिटाचे पैसे वसूल करण्यासाठी तुम्ही संपूर्ण अडीच तास न आवडलेला सिनेमा बघण्यासाठी देता, मन रमवण्यासाठी मध्यंतरात नाश्ताही करता.
“अनलिमिटेड ब्रेकफास्ट, तो ही फक्त ₹ ४९९ मध्ये..!” अशी प्रसिद्ध फाईव स्टार हॉटेलची जाहिरात तुम्ही बघता आणि सरप्राईज म्हणून तुमच्या जोडीदाराला तिथे घेऊन जाता. तुम्ही शुद्ध शाकाहारी आहात. नाश्त्याला उपलब्ध असणारे बहुतेक पदार्थ मांसाहारी आहेत, तुम्हा उभयतांना न आवडणारे किंवा घरी नियमित नाश्त्याला असणारे पोहे, उपीट असेच पदार्थ तुम्हाला खावे लागतात. पैसे वसूल करण्यासाठी भरपेट नाश्ता तुम्ही करता.
कपडे खरेदीसाठी घरापासून दूरच्या नावाजलेल्या मॉलमध्ये तुम्ही जाता. कपड्यांच्या दर्जाच्या तुलनेत प्रचंड महाग दराने खरेदी करणे तुम्हाला शक्य होत नाही. इतक्या लांब आपण आलो आहोतच तर इतर काहीतरी विकत घेण्याचे तुम्ही ठरवता. परदेशी प्रसिद्ध ब्रँडच्या फुटवेअर शोरूममधून तुम्ही चपला आणि शूजची खरेदी करता. मॉलमध्ये येण्या-जाण्याचा वेळ आणि पैसे खर्च झालेत म्हणून गरज नसतांना तुमची खरेदी होते.
वरील तिन्ही उदाहरणांमधील वर्तनास “संक कॉस्ट फॅलसी” म्हणजेच “बुडीत खर्चाचा भ्रम” कारणीभूत ठरतो. एखादे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पैसे, श्रम आणि वेळ खर्च करता परंतु तुम्हाला अपेक्षित परिणाम दृष्टीपथात येत नाहीत. तरीही आपले पूर्वीचे प्रयत्न वाया जाऊ नयेत म्हणून तुम्ही अजून जास्त पैसे, श्रम आणि वेळेची गुंतवणूक करता. कालांतराने भ्रमाचा भोपळा फुटतो आणि तोपर्यंत न भरून येणारे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असते.
खूप दिवसांपासून असलेले आपले नाते टिकावे म्हणून जोडीदार कसाही वागला तरी जुळवून घेण्याचा कल अनेकांचा असतो. "या नात्यात मी भरपूर वेळ दिला आहे म्हणून हे काहीही करून टिकवायचेच!" हा सुद्धा संक कॉस्ट फॅलसीचाच एक प्रकार आहे. पूर्वी या नात्यासाठी दिलेला वेळ निघून गेला आहे. तुम्ही वेळ दिला म्हणून भविष्य चांगलेच असणार आहे असे नाही. नाते टिकवायचे की नाही हा निर्णय सद्य परिस्थितीचा विचार करून घ्यायला हवा.
शेअर बाजार आणि संक कॉस्ट फॅलसी -
“कमी किमतीत शेअर खरेदी करा आणि जास्त किमतीला विका !” हा दीर्घकाळात शेअरबाजारातून पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मंत्र आहे असे म्हणतात. खरेदी करण्यासाठी नेमकी कमी किंमत कोणती हे ओळखणे मात्र फार कमी लोकांना साध्य होते.
कुठून तरी ऐकून स्वतः अभ्यास न करता शेअर खरेदी केले आणि त्यांची किंमत कोसळायला सुरुवात झाली तर बहुतेक खरेदीदार घाबरतात आणि पटकन त्यांचे शेअर्स विकून मोकळे होतात. काही धीट लोक मात्र त्यांनी योग्य किमतीत योग्य शेअर खरेदी केले आहेत या त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेले हे लोक स्वतःचे शेअर्स अगदी ५०% नुकसान झाले तरी विकत नाहीत. इथे “संक कोस्ट फॅलसी” म्हणजे “बुडीत खर्चाचा भ्रम” काम करत असतो.
“तुम्ही असेच शेअर्स खरेदी करा की शेअर बाजार १० वर्षे जरी बंद असला तरी तुम्हाला फरक पडता कामा नये !” असे गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांचे प्रसिद्ध वचन आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने, दीर्घकाळासाठी, योग्य किमतीला शेअर्स खरेदी करण्यासाठी बफे ओळखले जातात. त्यांचे अजून एक वचन तितकेच प्रसिद्ध आहे, “When you find yourself in a hole, the best thing you can do is stop digging” नवशिके गुंतवणूकदार १० वर्ष शेअर्स विकायचे नाहीत असा गैरसमज करून घेतात. कृपया लक्षात घ्या, उतम कंपन्यांच्या शेअर्ससाठी १० वर्षे ते न विकण्याचे धोरण लागू होऊ शकते. आपण अत्यंत महाग दराने खराब कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत किंवा तंत्रज्ञानातील बदल किंवा सरकारी धोरणातील विपरीत बदल झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्ही शेअर्स विकायचा विचार करायला हवा.
पूर्वी केलेला आणि वसूल न होऊ शकणारा किंवा त्याचा मोबदला न मिळू शकणारा खर्च म्हणजे बुडीत खर्च!
आर्थिक निर्णय घेताना जे अनेक घटक निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असतात त्यातला हा एक महत्वाचा घटक आहे. पूर्वी घेतलेले श्रम किंवा केलेल्या खर्चाचा निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ न देणे योग्य निर्णयासाठी महत्वाचे ठरते.
रिलायन्स पॉवर आणि संक कॉस्ट फॅलसी -
उद्योजक धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी नावारूपाला आणली. लाखो सामान्य गुंतवणूकदारांना रिलायन्सच्या शेअरने मालामाल बनवले होते. धीरूभाईंनंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या त्यांच्या चिरंजीवांमध्ये रिलायन्स साम्राज्य विभागले गेले. पेट्रोलियम, गॅस, केमिकल असे पूर्वापार सुरु असलेले उद्योग मुकेश यांच्याकडे तर टेलिकॉम, वित्तीय सेवा, मनोरंजन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि विद्युत निर्मिती असे नवीन व्यवसाय अनिल यांच्याकडे आले. मोठा गाजावाजा करून अनिल अंबानी यांनी “रिलायन्स पॉवर लिमिटेड” या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात फेब्रुवारी २००८ मध्ये आणला होता. ₹११,५६३ कोटी बाजारातून उभे करायची रिलायन्स पॉवरची योजना होती. रिलायन्स ब्रॅण्डमुळे आयपीओसाठी ७२ पट मागणी गुंतवणूकदारांनी नोंदवली. रिटेल गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर किंमत ₹४३० इतकी ठेवण्यात आली होती. शेअर लिस्ट झाल्यावर ₹५३८ पर्यंत पोहोचला आणि बाजार बंद होताना तो ₹३७३ रुपयांपर्यंत खाली आला. एकाच दिवसात सामान्य गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. पुढील कालावधीत रिलायन्स पॉवर शेअर वधारण्यासाठी आवश्यक नफा कमवू शकली नाही आणि शेअरचे भाव कमी कमी होतच गेले.
आपला निर्णय चुकला आहे, जी काही किंमत हातात पडेल ती घेऊन रिलायन्स पॉवरचे शेअर्स विकावे आणि मोकळे व्हावे असा विचार अनेक गुंतवणूकदारांनी केला आणि त्यांनी शेअर्स विकून नुकसान सहन केले.
काही गुंतवणूकदार मात्र त्यांच्या आयपीओतून शेअर खरेदी केल्याच्या निर्णयावर ठाम होते. आपण अभ्यासपूर्वक शेअर खरेदी केले आहेत, रिलायन्स नावामुळे हा शेअर कधीतरी भविष्यात उसळी घेईल आणि आपण नफा कमवू असे त्यांना वाटत होते. परंतु गेल्या १४ वर्षांत रिलायन्स पॉवरचा शेअर चक्क १ रुपया १५ पैसे पर्यंत खाली आला होता आणि सध्या तो ₹१५ च्या आसपास व्यवहार करतो आहे. २०११ पर्यंत ₹१०० च्या आसपास शेअरची किंमत होती, ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओद्वारे खरेदी केलेले शेअर्स २०११ पर्यंत विकले त्यांना जवळपास ७७% मुद्दल रकमेचे नुकसान सोसावे लागले तर सध्या शेअर विकले तर जवळपास ९७% मुद्दलाचे नुकसान सोसावे लागणार आहे.
गेल्या १४ वर्षांत शेअर बाजारातील आघाडीच्या कंपन्यांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे आणि काही कंपन्यांचे शेअर्स पटींमध्ये वधारले आहेत. संक कॉस्ट फॅलसीमुळे आयपीओद्वारे खरेदी केलेले रिलायन्स पॉवर शेअर्स न विकलेल्या मंडळींनी मुद्दल तर गमावले आहेच तसेच शेअर बाजारातून नफा मिळवायच्या इतर अनेक संधीही गमावल्या आहेत.
मागील दोन वर्षांमध्ये आयपीओचे पीक शेअर बाजारात आले होते. पेटीएम, डेलीव्हरी, पॉलिसीबाजार अशा अनेक कंपन्यांचे शेअर्स ५०% नुकसानीत आहेत. आयपीओद्वारे खरेदी केलेल्या, नुकसान झालेल्या अशा कंपन्यांचे शेअर्स केवळ संक कॉस्ट फॅलसीमुळेच आपण विकत नाही ना? हा विचार करायला हवा.
संक कॉस्ट फॅलसीमागील कारणे आणि तुम्ही काय काळजी घ्याल?
यशासारखे यश नसते असे म्हणतात. तुमची प्रत्येक शेअरमधील गुंतवणूक फलदायी ठरेलच असे नाही. कितीही पट्टीचा वाहन चालक असला तरी प्रत्येक वेळेस गाडी त्याला जागरूक राहूनच चालवावी लागते. त्याचप्रमाणे शेअर्स मधील पूर्वी मिळालेल्या यशात मश्गुल राहून संक कॉस्ट फॅलसीला बळी पडून नवीन गुंतवणूक संधी तर आपण गमावत नाही ना हा विचार नेहमी करायला हवा.
आपली चूक मान्य करणे म्हणजे आपल्यात काहितरी कमी आहे किंवा अपयश आपल्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही असे गैरसमज अनेकांचे असतात. यामुळेच वेळीच लक्षात आल्या तरी संक कॉस्ट फॅलसीमुळे चुकांमध्ये सुधारणा करण्याऐवजी त्यांचे समर्थन केले जाते आणि वास्तव परिस्थिती स्वीकारली जात नाही. घर खरेदी करतांना तुम्ही तुमच्या बजेट पेक्षा महाग घर घेतले आणि आता हप्ते भरायला खूप ओढाताण होत असेल, कर्जहप्ते भरायला अजून दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल तर सध्याचे महाग घर विकून हप्ता भरायला सोयीचे परवडणारे घर घ्यावे का? असा विचार तुम्ही वेळीच करायला हवा.
“विजेते कधीही हार मानत नाहीत आणि पराभूत व्यक्ती कधीच जिंकू शकत नाहीत.” असे फुटबॉल प्रशिक्षक विन्स लोम्बार्डी यांचे वचन आहे. परंतु हे सदासर्वकाळ खरे ठरेलच असे नाही. संक कॉस्ट फॅलसीमध्ये 'आपण बदलायला हवे' हे लक्षात आले तरी माघार घेतली जात नाही. लढाई हरली पण युद्ध जिंकायचेच असे धोरण हवे. शेअर खरेदीचे निर्णय सतत चुकत असतील तर इक्विटी म्युच्युअल फ़ंडांमार्फत आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करायला हवी. बँक ठेवींवरील व्याजापेक्षा जास्त परतावा मला मिळवायचा असे ध्येय असेल तर पर्यायांचा शोध घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणे महत्वाचे आहे.
भावनिक निर्णय टाळा. तथ्यांवर आधारित तर्कनिष्ठ निर्णय घ्यायची सवय लावा. संक कॉस्ट फॅलसीमध्ये तुम्ही भावनिक होता. कुठली कंपनी छान वाटते यापेक्षा कंपनीच्या नफ्याचे आकडे काय बोलतात, भूतकाळात कंपनीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची भविष्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता किती आहे, व्यवस्थापनाची गुणवत्ता, व्यवसायातील संधी अशा अनेकविध गोष्टींचा विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हवा.
समारोप - संक कॉस्ट फॅलसी म्हणजे बुडीत खर्चाच्या भ्रमातून, पूर्वग्रहातून आपली सुटका कशी करायची याबाबत मार्गदर्शन करणारा चाणक्यनिती मध्ये एक चपखल श्लोक आहे.
गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥ (१३/२)
भावार्थ - आपण भूतकाळाबद्दल पश्चात्ताप करू नये किंवा भविष्यात काय होईल याची अनावश्यक चिंता करू नये. बुद्धिमान लोक वर्तमान परिस्थितीनुसार जीवन जगतात.
'विचक्षण' या शब्दाचे अर्थ कुशाग्र, दक्ष, दूरदर्शी, विद्वान असेही आहेत. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयांना चिकटून राहण्याच्या प्रयत्न 'विचक्षण' व्यक्ती करत नाहीत. ''आपण 'विचक्षण' होण्याच्या मार्गावर आहोत का?'' याचे चिंतन करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !
सीए अभिजीत कोळपकर - “अर्थसाक्षर व्हा!” या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत