समूह मानसिकता आणि आपले आर्थिक निर्णय !

Image
  •    01 Sep 2023

  • If everybody is thinking alike, then somebody isn't thinking. ― George S. Patton

  • Investors, most of them, have a herd mentality. They want to invest only if other people are investing - Jessica Livingston

  • Following the herd is fine, until they all run off the side of a cliff together. - Glenn Beck


तुम्ही स्वतःची गाडी घेऊन सहलीसाठी बाहेरगावी फिरायला गेला आहात. दुपारची वेळ आहे. गाडीतल्या सर्वांच्या पोटात कावळे ओरडत आहेत. चांगल्या रेस्टॉरंटमध्ये थांबायचे आणि यथेच्छ ताव मारायचा बेत तुम्ही करता. नेमके कुठे थांबायचे हे ठरवताना एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे कुठल्या रेस्टॉरंट बाहेर सर्वात जास्त गाड्या थांबल्या आहेत हे बघणे. इतरांचा विचार करून निर्णय घेणे योग्य की अयोग्य हा विषय नसून आपल्या निर्णयांवर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे हे समजून घेणे होय.


  • इतर लोक जे करत असतील ते काहीतरी योग्य विचार करूनच करत असतील, तेव्हा आपल्या डोक्याला जास्त त्रास न देता, बहुसंख्य लोकांप्रमाणे वागणे म्हणजे “समूह मानसिकता”!  पूर्वग्रहांमुळे आपले निर्णय चुकतात. समूह मानसिकतेने आर्थिक निर्णय घेणे हासुद्धा एक पूर्वग्रह आहे. (Herd Mentality Bias)

  • विविध निर्णय घेताना अशाच प्रकारचे वर्तन आपले असते. मुलांच्या शाळेची निवड करताना, सहलीचे ठिकाण ठरवताना, कपड्यांची फॅशन करताना इतकेच काय तर जोडीदार ठरवतानाही आपल्यापेक्षा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. 

  • आर्थिक निर्णय घेताना मात्र हर्ड मेंटॅलिटी अनेकदा नुकसानीस आमंत्रण देते. इतर लोकांनी घेतलेले आर्थिक निर्णय कॉपी पेस्ट करून वापरायची सवय म्हणजे डोळे बंद करून दुसऱ्यांच्या मापाचे कपडे वापरण्यासारखे असते. 

  • माहिती गोळा करून, अभ्यास करून, साधक बाधक विचार करून, विविध पर्याय तपासून निर्णय घेण्याऐवजी कुणीतरी घेतलेला निर्णय तसाच्या तसा कार्यवाहीत आणणे म्हणजे समूह मानसिकतेला शरण जाणे होय.

  • पूर्वी आदिमानव कळपात रहात असे. शिकार करणे, कंदमुळे शोधणे, टोळीतल्या लोकांची सुरक्षा सांभाळणे अशी कामे विभागली जात असत. एखाद्या ठिकाणी आज रात्री मुक्काम करायचा का नाही हे कुणी एकट्याने न ठरवता टोळीतील अनुभवी, हुशार पुढारी ठरवत असावेत. बहुतेक लोकांना स्वतः विचार करून निर्णय घ्यायची सवय नसते. इतर लोकांनी ठरवले आहे म्हणजे ते योग्यच असेल, कशाला आपण शंका विचारून वाद घालायचा असा विचार करून टोळीतले सर्वसामान्य सदस्य सामूहिक निर्णय मान्य करत. समूहातील इतर लोकांना खुश करायचासुद्धा त्यांचा प्रयत्न असतो. विरोध करून कशाला कोणाला दुखावायचे असेही त्यांना वाटत असते. टोळीत रहाणे म्हणजे सुरक्षा अशी गोष्ट त्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेली होती.

  • हजारो वर्षांनंतरही ही कळपाची मानसिकता आपल्यामध्ये कायम आहे. ठराविक काळानंतर कपडे व केसांची फॅशन बदलते. ट्रेंड नुसार स्वतःला अद्ययावत ठेवायचा प्रयत्न नेहमी सुरु असतो. 

  • विराट कोहलीने दाढी राखायला सुरुवात केल्यावर इतर क्रिकेटपटू, सिनेमा नायक, प्रसिद्ध व्यक्तींनीही दाढीचे विविध प्रकार लोकप्रिय केले. जिलेट या दाढीचे रेझर व त्यासंबंधित विविध वस्तू तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीचा भारतातील  व्यवसाय गेली काही वर्षे फारशी प्रगती करत नाही. कंपनी व्यवस्थापनाला या बाबत विचारणा केली असता त्यांचे उत्तर होते की ज्या देशातली निम्मी तरुणाई दाढी राखते, तिथे आमचा व्यवसाय कसा वाढणार?

1980 च्या काळात अत्यंत लोकप्रिय असलेली 'बेलबॉटम पँट'ची फॅशन समूह मानसिकतेचे एक इरसाल उदाहरण आहे. (पूर्वी लोक का-ही-ही फॅशन करत असत असे म्हणून तुम्ही गालातल्या गालात हसू नका. अजून 40 वर्षांनी आपल्या आताच्या फोटोंकडे बघून असेच कुणीतरी हसणार आहे!)


  1. आर्थिक निर्णय व समूह मानसिकता 

  • आर्थिक निर्णय घेताना कळपाची मानसिकता नेहमीच फायदेशीर ठरेल असे नाही. तुमच्या आसपास असलेले लोक भरपूर खर्च करणारे असतील तर तुम्हालाही तशीच भरपूर खर्च करायची सवय लागू शकते. या उलट तुमच्या आजूबाजूचे लोक काटकसरी आणि दूरदृष्टीने विचार करून पैसे बचत करणारे, गुंतवणूक करणारे असतील तर तुम्ही सुद्धा "खर्च प्रेमी" ऐवजी "बचत प्रेमी" होता. 

  • खरेदी करताना आपण गुगल रिव्ह्यू तपासल्याशिवाय पुढे जात नाही. इतर लोकांचे मत विचारात घेऊन आपला निर्णय घेणे हा अशाप्रकारे एक सवयीचा भाग बनला आहे.  

  • समूह मानसिकता चांगली किंवा वाईट या दोनच रंगांमध्ये रंगवायला नको. एखाद्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करताना समूह शक्ती सकारात्मक परिणाम घडवून आणते. भारतीय स्वातंत्र्यलढा याचे एक उत्तम उदाहरण आहे. 


  1. ट्यूलिप मेनिया 

  • ट्यूलिप मेनिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगातला पहिला आर्थिक बुडबडा निर्माण होण्यात हर्ड मेंटॅलिटीचा सुद्धा फार मोठा सहभाग होता. 

  • 17 व्या शतकाच्या सुरुवातीला हॉलंड जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. आशिया खंडातील आपल्या वसाहतींतून कवडीमोल भावाने खरेदी केलेले मसाले कित्येक पट किंमतीला डच लोक युरोपमध्ये विकत होते.  हॉलंड मधील उच्चभ्रू लोकांना पैसे कुठे खर्च करायचे असा प्रश्न पडला होता. आपल्याकडे पैसे आहेत हे लोकांना दिसायला हवे यासाठी नवनवीन प्रकार शोधले जात होते. 

  • डचांचे लक्ष ट्युलिप फुलाकडे वळले. विविध रंगात उपलब्ध असणाऱ्या नयनरम्य, सुगंधी  ट्युलिप फूलांच्या प्रेमात डच मंडळी बुडाली. प्रेमात माणूस वेडा होतो ही उक्ती त्यांनी ट्युलिप बाबतीत प्रत्यक्षात आणली. तत्कालीन हॉलंडमध्ये ट्यूलिपची शेती केली जात नव्हती व ती फुले तुर्कस्तानातून आयात केली जायची. 

  • ट्यूलिप फुले खरेदी केली तर त्यांची किंमत वाढत जाणार व आपला फायदा होणार म्हणून आधी श्रीमंतांनी आणि नंतर सर्वसामान्यांनी ट्यूलिप विकत घ्यायला सुरुवात केली. ट्यूलिपची फुले आज लागवड केल्यावर उद्या सकाळी लगेच काही झाडाला येत नाहीत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या ट्युलिपचा साठा तर संपलाच पण भविष्यात उगवल्या जाणाऱ्या ट्युलिपच्या फुलांचे सुद्धा सौदे वायदे बाजारात व्हायला लागले. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यास वस्तूंचे भाव वाढत जातात हा अर्थशास्त्रातला "मागणी पुरवठा सिद्धांत" इथेही लागू पडला. ट्यूलिपचा पुरवठा नाही आणि मागणी तर प्रचंड! परिणामी भाव रोजच्या रोज वाढत होते. सर्वसामान्य डच व्यक्तीच्या दहा वर्षांच्या कमाई इतकी एका ट्यूलिपची किंमत जाऊन पोहोचली. 

  • मी खरेदी केलेल्या फुलातून मला भविष्यात किती उत्पन्न मिळेल यापेक्षा कुणीतरी माझ्याकडून अजून जास्त किंमतीला हे फूल विकत घेईल असा विचार अनेकांनी केला. इतर सर्वजण ट्यूलिप फुले विकत घेत आहेत म्हणजे ते जे काही करत असतील ते बरोबरच करत असतील अशा प्रकारे समूह मानसिकता तयार झाली. लोक आयुष्यातली सर्व जमापुंजी ट्यूलिपच्या फुलांमध्ये गुंतवत होते. अनेकांनी घरे, शेती, गुरे - ढोरे गहाण ठेवून कर्ज काढले आणि आणि ट्यूलिप फुले विकत घेतली. 

  • कृत्रिम भाव वाढ आणि समूह मानसिकतेमुळे निर्माण झालेला हा आर्थिक बुडबुडा काही कालावधीने फुटायला सुरुवात झाली. सर्व आर्थिक बुडबुड्यांचे कालांतराने जे होते तेच इथे झाले. ट्युलिप्स चे भाव ज्या वेगाने वाढले गेले त्यापेक्षा जास्त वेगाने कोसळायला सुरुवात झाली. अनेक लोक कफल्लक झाले, कर्जबाजारी झाले, कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या. परंतु कुठलेही उत्पन्न न देणाऱ्या फुलांमध्ये गुंतवणूक करून कसा काय नफा प्राप्त होणार आहे हा साधा प्राथमिक विचार सुद्धा सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी केला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे "पैसे कमावण्याच्या स्पर्धेत इतरांपेक्षा मी पिछाडीवर रहायला नको!" अशी त्यांची मानसिकता तयार झाली होती. 

  • डच लोकांना या ट्यूलिप मेनियाचा फुगा फुटल्यावर निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून सावरायला पुढची जवळपास चार दशके लागली. इंटरनेट युगामध्ये कमी श्रमांत व कमी कालावधीत कुठलाही संदेश वेगाने लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. समूह मानसिकता सोशल मीडियामुळे जास्त परिणामकारकतेने काम करते. ट्यूलिप मेनियाच्या काळात म्हणजे सतराव्या शतकात इंटरनेट नव्हते. इंटरनेट युगात आपण समूह मानसिकतेने चुकीचा आर्थिक निर्णय तर घेत नाही ना याबाबत आपण अधिक सतर्क असायला हवे.


  1. शेअर ट्रेडिंग व समूह मानसिकता -  

  • शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अभ्यासपूर्वक, चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी असे यशस्वी गुंतवणूकदार सांगतात. अनेक वेळा "मी आज ट्रेडिंग करून इतके जास्त पैसे मिळवले" याचे स्क्रीनशॉटस् विविध फायनान्शियल इन्फ्लुएंसर शेअर करतात किंवा त्यांच्या यूट्यूब व्हिडिओतून लोकांना सांगतात, “मी शेअर ट्रेडिंग करून भरपूर पैसे मिळवले, तुम्ही माझ्याकडे क्लास लावा, माझे चॅनेल सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा !” आपोआपच दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा लोकांचा ओढा अल्पकालीन नफ्यासाठी शेअर ट्रेडिंग कडे वळतो. इतर अनेक लोक शेअर ट्रेडिंग करतात. फायदा मिळतो म्हणूनच ते शेअर ट्रेडिंग करत असणार या समूह मानसिकतेमुळे निर्माण झालेल्या सोयीस्कर गोड गैरसमजातून ते स्वतःचे खूप मोठे आर्थिक नुकसान करून घेतात. 

  • सेबीने 25 जानेवारी, 2023 रोजी एक अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजे इक्विटी डेरिव्हेटिव्हज् मध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांनी किती नफा-तोटा मिळवला याबाबत धक्कादायक माहिती मिळते. 

    • कोरोना काळानंतर शेअर ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. 2019 मध्ये 7.1 लाखांवरून ट्रेडर्स 2022 पर्यंत 45.2 लाखांपर्यंत म्हणजे 5 पट वाढले.  

    • या अहवालानुसार 89% ट्रेडर्सला म्हणजे 10 लोकांपैकी 9 लोकांना इक्विटी डेरिव्हेटिव्हजमध्ये तोटा सहन करावा लागला आहे. या तोट्याचे सरासरी प्रमाण प्रत्येकी ₹1.11 लाख होते. ज्या लोकांनी नफा मिळवला त्यांचा सरासरी नफा फार मोठा नसून फक्त ₹1.52 लाख इतकाच होता.   

    • केवळ 1% शीर्ष ट्रेडर्सने एकूण नफ्याच्या 51% नफा मिळवला व 5% शीर्ष ट्रेडर्स ने एकूण नफ्याच्या 75% नफा मिळवला. 


तपशील 

FY 19

FY 22

विचारात घेतलेल्या ट्रेडर्सची संख्या 

7.06 लाख 

45.25 लाख 

नुकसान सहन केलेले ट्रेडर्स

85%

89%

नफा मिळवलेले केलेले ट्रेडर्स

15%

11%

नफा - सरासरी रक्कम प्रती ट्रेडर

₹ 1.46 लाख 

₹ 1.52 लाख 

तोटा - सरासरी प्रती ट्रेडर 

₹ 1.74 लाख 

₹ 1.11 लाख 

स्रोत - Sebi Study - Analysis of Profit and Loss of Individual Traders dealing in Equity F&O Segment

  • सेबीने शेअर ट्रेडिंग बाबत डोळ्यात अंजन घालणारी एवढी स्फोटक माहिती प्रसिद्ध करूनही दुर्दैवाने फारशी प्रसिद्धी या अहवालास मिळाली नाही. 

  • अर्थसाक्षरतेबाबत सार्वत्रिक अनास्था, झटपट श्रीमंत व्हायची लालसा, भावनेला साद घालणाऱ्या शेअर ट्रेडिंग क्लासेसच्या जाहिराती, एक क्लास केला की कमी श्रमांत भरपूर पैसे मिळवायची आशा या सर्वांचे मिश्रण म्हणजे शेअर ट्रेडिंग करून झटपट पैसे मिळवायची समूह मानसिकता !  


  1. क्रिप्टो करन्सी आणि समूह मानसिकता - 

  • क्रिप्टो करन्सी म्हणजे जणू काही चौथी औद्योगिक क्रांती असे सर्वसामान्यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोशल मीडियामुळे वाटायला लागले होते. बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करन्सी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर अवलंबुन आहेत. ब्लॉकचेनमुळे भविष्यात अनेक बदल होतील पण म्हणून ब्लॉकचेनचा वापर करणारी क्रिप्टो करन्सी मालमत्तेचा एक प्रकार म्हणून फायदेशीर होईलच असे नाही.

  • दरम्यानच्या काळात  कुणीही, कधीही, कुठेही, कुठल्याही नियंत्रणाशिवाय स्वतःच्या क्रिप्टो करन्सी व क्रिप्टो एक्सचेंज सुरू केले. नेहमीप्रमाणे हा फुगा फुटला आणि गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. ज्यांनी कोणी इतरांच्या मतांवर विश्वास ठेवून, स्वतः कुठलाही अभ्यास न करता, व्हायरल मेसेजेस वर विश्वास ठेवून क्रिप्टोकरन्सी मध्ये पैसे गुंतवले त्यांना डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली. 

  • टेस्ला, स्पेस एक्स, ट्विटर या कंपन्यांचा मालक असलेला इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक व एक अतरंगी व्यक्ती आहे. ट्विटरवर मस्क यांनी ते डोजकॉईन ही क्रिप्टोकरन्सी विकत घेत आहेत असे जाहीर केले आणि लोकांच्या उड्या डोजकॉईनवर पडल्या. नेहमीप्रमाणे नंतर किमती पडल्या आणि लोकांचे नुकसान झाले. केवळ मस्क यांनी ट्विट केले म्हणून स्वतः अभ्यास न करता घेतलेल्या या बिनडोक आर्थिक निर्णयातही समूह मानसिकता काम करत होती. 


आर्थिक निर्णय घेताना हर्ड मेंटॅलिटी पासून स्वतःचा बचाव कसा कराल - 

  1. FOMO पासून स्वतःला वाचवा. "Fear of Missing Out" म्हणजे इतरांच्या तुलनेत मी मागे राहतो का काय असा विचार सतत करणे. इतर लोक खर्च करताना पैसे कुठून आणत आहेत म्हणजे स्वतःच्या कमाईतून किंवा कर्ज काढून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपले बजेटमध्ये कोणता खर्च आहे हे बघूनच खर्च करा.

  

  1. अभ्यासपूर्ण निर्णय घ्या. प्रवाहासोबत किंवा प्रवाहाविरुद्ध जायला हवे असे नाही. स्वतः अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा. विचार करायचे काम आउटसोर्स करू नका. केवळ मित्र, नातेवाईक, शेजारी यांचे ऐकून कुठलेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. आर्थिक सल्लागाराची योग्यवेळी मदत घ्या.   


  1. शेअर बाजारात गुंतवणूक करताना एखाद्या कंपनीचे भक्त होऊ नका. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रसंगी दुसऱ्या कंपनीमध्येही गुंतवणूक करायची तयारी ठेवा. आपण अभ्यास करून गुंतवणुकीसाठी निवडलेली कंपनी चांगला परतावा देत नसेल तर आपला निर्णय चुकला आहे हे मान्य करायची तयारी ठेवा. 


  1. आर्थिक निर्णय घेताना भावनाशील होऊ नका. आपल्या मृत्यू पश्चात लाडक्या कुटुंबीयांना मजबूत रक्कम विमा कंपनीने द्यावी म्हणून डोईजड प्रीमियम असलेला विमा विकत घेऊ नका. यामुळे कुटुंबीयांना आवश्यक सुखसोयी देण्याऐवजी मोठ्ठा विमा प्रीमियम भरण्यात तुमची विनाकारण ओढाताण होऊ शकते. 


"आर्थिक निर्णय घेताना मी स्वतःच्या अभ्यासापेक्षा समूह मानसिकतेला प्रत्येकवेळी किती महत्व देतो?" या सोप्या प्रश्नाच्या चिंतनासाठी तुम्हाला शुभेच्छा !  


  • सीए अभिजीत कोळपकर - “अर्थसाक्षर व्हा!” या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत.