पैशाची किंमत प्रत्येकासाठी वेगवेगळी का असते? - Mental Accounting

  •    01 Sep 2023


अर्थविषयक विविध पूर्वग्रह असतात. पूर्वग्रहदूषित विचार केल्यामुळे आपले आर्थिक निर्णय चुकतात. मेंटल अकाउंटिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वग्रहामध्ये आपल्याकडील पैश्याला वेगवेगळे लेबल आपण लावतो आणि त्यामुळे नुकसान होते. 


बचतीचे पैसे ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात. बेडरूममध्ये कपाटात,  देव्हाऱ्यातल्या कप्प्यात, स्वयंपाक घरातील माळ्यावरच्या स्टीलच्या डब्यात असे रोख पैसे ठेवायच्या विविध जागा असतात. पूर्वी आपली आई वेगवेगळ्या कागदी पाकिटात वाढदिवसासाठी, दवाखान्यासाठी, मुलांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे सांभाळून ठेवायची असे अनेकांना आठवत असेल. ऐनवेळी पंचाईत नको म्हणून पैसे साचवणे हे धोरणी कुटुंबाचे लक्षण जरी असले तरी गरज असल्यास एका पकीटातले पैसे दुसऱ्या कामासाठी वापरायची लवचिकता आई दाखवत असे. 


पैशाची किंमत व्यक्तिसापेक्ष विभिन्न असते. लोक इतरांच्या दृष्टीने अतार्किक आणि चुकीचे गुंतवणूक निर्णय घेतात. स्वमालकीचे घर न घेता भाड्याच्या घरात काही लोक वर्षानुवर्षे राहतात. घरमालकाला भाडे भरण्यापेक्षा गृहकर्जाचा हप्ता बँकेला दिला तर 15-20 वर्षांमध्ये स्वतःचे घर होते. याउलट गृह कर्जाच्या हप्त्यापेक्षा फार कमी दरमहा भाडे भरले तर उर्वरित रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवून दीर्घकाळात भरभक्कम परतावा मिळतो. दोन्ही पक्ष एकमेकांना अर्थदुष्ट समजतात. दोघांचे युक्तिवाद कितीही बरोबर किंवा चुकीचे असले तरी पैशाची किंमत व्यक्तिसापेक्ष असते हेच यातून सहज लक्षात येते. 


हा विषय रिचर्ड थेलर यांनी "Mental Accounting Matters" या शोध निबंधाद्वारे मांडला. पैसा वस्तू - सेवा खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे साधन असून पैशाची किंमत सारखीच असते. परंतु लोक पैशाची किंमत सारखी आहे हे समजून घेत नाहीत. सर्वसाधारणपणे स्वत:च्या मेहनतीने मिळवलेल्या पैशाचे मूल्य आयत्या मिळालेल्या संपत्तीपेक्षा जास्त असते असे आढळून येते. आपण काही उदाहरणे बघूया-


  1. वार्षिक बोनस - "माझा बोनस होऊ दे फक्त, लगेच आपण काश्मीर ट्रीप बुक करून टाकू!" किंवा "दिवाळी बोनस मधून आपण मोठ्ठा टिव्ही विकत घेऊ!" असे संवाद आपण नेहमी ऐकत असतो. नोकरीला सुरुवात करताना वार्षिक पॅकेज मध्ये बोनस चा समावेश बहुतेक वेळा केलेला असतो. दरमहा मिळणारा पगार आणि वार्षिक बोनस यामध्ये विनाकारण भावनिक भेद  केला जातो. मासिक उत्पन्न जेवढे काट्याकाळजीने वापरले जाते तेवढ्या बारीक नजरेने बोनस कडे बघितले जात नाही. तुम्ही जॉईनिंग बोनस, इन्सेंटीव्ह, रेफरल बोनस, वार्षिक बोनस अशा सर्व रकमा नियमितपणे गृह कर्जाच्या मुद्दल रकमेत भरल्या तर गृह कर्जाचा 15 किंवा 20 वर्षे अशा एकूण मूळ कालावधीच्या कित्येक वर्षे आधीच तुम्ही कर्जमुक्त होऊन चिंतामुक्त आयुष्य जगू शकता. 


  1. मृत्यूपत्राद्वारे किंवा भेट म्हणून प्राप्त झालेली संपत्ती - पालक किंवा आजी आजोबा यांच्याकडून इच्छापत्राद्वारे प्राप्त झालेली संपत्ती विकताना अनेकजण गंभीर नसतात. उदा - अमेरिकेत सेटल झालेल्या आदित्यला आजीने तिच्या पश्चात पुण्यात कोथरूड भागात एक फ्लॅट भेट दिला होता. आदित्यचा फ्लॅट विक्री व्यवहार ₹ 1 कोटी रुपयांना जवळपास नक्की होत आला होता. मात्र त्याचा त्याच भागात राहणाऱ्या दिपक या मित्राच्या मते सर्व सुखसोयींनी सजलेल्या फ्लॅट साठी अजून किमान ₹ 10 लाख तरी यायलाच हवेत. आदित्यने त्याला सांगितले की अरे दीपक हा फ्लॅट मला आयता आला होता, मिळणारे ₹1 कोटी खूप आहेत, ₹ 10 लाखांनी काही फरक पडत नाही वगैरे..आदित्यची हीच बेफिकिरी अमेरिकेत त्याने पै-पै जोडून खरेदी केलेल्या कुठल्याही वस्तूच्या विक्री प्रसंगी गायब होते.  


  1. लॉटरी द्वारे प्राप्त संपत्ती - लॉटरी म्हणजे एक प्रकारचा जुगारच. नशिबाने दान पदरात टाकले तर क्षणात लॉटरी द्वारे भाग्य बदलते. बहुतेक लॉटरी विजेते अशी मिळालेली संपत्ती राखण्यास अपयशी ठरतात. अचानक मिळालेले पैसे चैनीच्या वस्तू व सेवा उपभोगण्यासाठी वारेमाप उधळले जातात. स्वत:च्या कमाईतील पैशापेक्षा लॉटरीतून प्राप्त झालेले पैशांची किंमत कमी असल्याने ते पटकन उडवले जातात आणि कालांतराने ते संपतात. 


  1. प्राप्तिकर परतावा - दरमहा मिळणाऱ्या पगारातून प्राप्तिकर कपात केला जातो. याला टीडीएस (Tax Deducted at Source) असे म्हणतात. तुम्ही कंपनीच्या अकाउंट्स डिपार्टमेंटला विहित काल मर्यादेच्या आत कर वजावट पुरावे म्हणजे विमा पावती, मुलांची शाळेची फी भरल्याची पावती, टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक इ. दाखल केले नाहीत तर सहजिकच ते जास्त टीडीएस कपात करणार. आयटीआर दाखल करताना तुम्ही योग्य वजावटी घेतल्या की तुम्हाला प्राप्तिकर खाते जास्त कपात केलेला कर परतावा म्हणून परत देते. थोडक्यात, तुमचेच पैसे तुम्हाला मिळतात. याबाबत स्वतःच्या चुकीमुळे आपला टॅक्स जास्त कपात झाला हा तुम्ही विचार करायला हवा. याउलट बहुतेक लोक टॅक्स रिफंड रक्कम म्हणजे आपले जास्तीचे उत्पन्न आहे की काय असे समजून ते पैसे चैनीच्या गोष्टींवर उडवतात. 


  1. क्रेडिट कार्डद्वारे खर्च करताना - एखादी वस्तू रोखीत खरेदी करताना विक्रेत्याला प्रत्यक्ष रोख रक्कम द्यावी लागते. आपण पैसे हाताने मोजतो आणि विक्रेत्याच्या हातात ते देतो. रोख पैसे हातातून जातानाची भावना ही क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यापेक्षा फार वेगळी असते. क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल 45 दिवसांची असते. आता लगेच पैसे देण्यापेक्षा उशिरा पैसे द्यावे लागणार आहेत, काही वेळा व्याज द्यावे लागले तरी बेहतर पण रोख खर्च नको असा विचार लोकांकडून कार्ड्स वापरताना केला जातो. इथे मेंटल अकाउंटिंग मुळेच रोखीतले पैसे आणि कार्ड मधले पैसे वेगवेगळे आहेत असा आभास तयार होतो. कित्येकदा कार्डद्वारे किती पैसे खर्च केले जात आहेत याचे गांभीर्य ग्राहकांना येत नाही. रोख खरेदीच्या तुलनेत कार्डद्वारे केलेली खरेदीसुद्धा तितकीशी लक्षात राहत नाही. 


  1. चतुर मार्केटिंगला बळी पडू नका ! - मोबाईल खरेदी करताना तुम्ही जेवढा जास्त किमतीचा मोबाईल खरेदी कराल तेवढ्याच जास्त किमतीची एक्सटेंडेड वॉरंटी, विमा, चांगले कव्हर, टेम्पर्ड ग्लास खरेदी करता. तुम्ही जरा कुठे या ॲक्सेसरीज खरेदी करताना विचार करता आहात असे विक्रेत्याच्या लक्षात आले की तो एक विनिंग आर्ग्युमेंट तुमच्यापुढे मांडतो. तो म्हणतो, "मॅडम, तुम्ही एवढा ₹40,000 किमतीचा मोबाईल विकत घेतलाय मग त्यासाठी फक्त ₹ 1,200 ची एक्सटेंडेड वॉरंटी आणि फक्त ₹ 2,000 चे कव्हर घ्यायलाच हवे. समजा तुम्ही साधे कव्हर घेतले आणि मोबाईल खाली पडला तर तुमचे ₹ 40 हजार रुपयांचे मोठ्ठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे या किरकोळ खर्चांकडे बघू नका!" असेच पैशांकडे वेगवेगळे बघायला लावणारे मेंटल अकाउंटिंगचे फंडे चार चाकी गाडी विकत घेताना किंवा फ्लॅट विकत घेताना तिथले चतुर विक्रेते वापरत असतात. 


मेंटल अकाउंटिंग च्या पूर्वग्रहातून स्वतःची सुटका कशी कराल?


मेंटल अकाउंटिंग पूर्वग्रहामुळे पैसे खर्च करताना किंवा गुंतवताना तुम्ही भावनाशील होऊन निर्णय घेता. सारासार विचार न केल्याने आपले नुकसान होते. हे टाळण्यासाठी तुमचे ध्येय नक्की असणे आवश्यक आहे.