आर्थिक निर्णय चुकवणारा अव्हेलेबिलीटी बायस!

Image
  •    01 Sep 2023

Availability Bias - Article

“Fools rush in where angels fear to tread.” —Alexander Pope


साक्षात् देवदूत म्हणजे अनुभवी लोक जेथे सावधगिरी बाळगतात तेथे मूर्ख लोक घाई करतात ! - अलेक्झांडर पोप


मूर्ख लोकांना सदैव घाई का असते? ते सावधगिरी का बाळगत नाहीत? असे कोणते प्रसंग आहेत जेथे सावधगिरी बाळगायला हवी पण तसे आपल्याकडून का होत नाही? आर्थिक निर्णय घाईत घेत असताना पूर्वग्रहूषित विचार केल्याने निर्णय चुकतात. विविध पूर्वग्रहांपैकी एक महत्वाचा पूर्वग्रह म्हणजे अव्हेलेबिलीटी बायस! 


  • तुम्हाला नवीन चष्मा घ्यायचा आहे आणि तुम्हाला सोनेरी काड्यांचा चष्मा आवडत असेल तर रस्त्याने जाताना किंवा विविध लोकांना भेटताना तुमचे लक्ष त्यांच्या सोनेरी फ्रेम कडेच असते. 

  • तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे आणि इलेक्ट्रिक गाडीचा विचार तुम्ही करत असाल तर फिरताना अनेक गाड्यांमधून तुमच्या दृष्टीस सगळीकडे इलेक्ट्रिक गाड्याच दिसतात. 

  • पावलं मोजण्यासाठी आणि वेगवेगळ्या डायल असणारे डिजिटल घड्याळ तुम्हाला घ्यायचे असेल आणि चौकोनी डायल तुम्हाला आवडत असेल तर तुमचे लक्ष लोकांच्या घड्याळाच्या गोल डायल आहे की चौकोनी डायल आहे याकडे असते. 

  • थोडक्यात, आपल्याला जे हवे आहे ते शोधायचा प्रयत्न मन सतत करत असते. 


याचाच पुढचा टप्पा म्हणजे निर्णय घेताना आपल्याकडील ताज्या माहितीला दिले जाणारे अवास्तव महत्व! अव्हेलाबिलीटी बायस मध्ये जी माहिती तुमच्याकडे आहे त्याच माहिती आधारे, नवीन माहितीकडे दुर्लक्ष करून पटकन निर्णय घेण्याचा तुमचा कल असतो. धक्कादायक बातम्या, सोशल मीडियावर सतत डोळ्यासमोर येणाऱ्या एकसारख्या पोस्ट्स, जाणीपूर्वक विशिष्ट माहितीचा विविध मध्यामांतून मारा करून घडवून आणलेली मते यांमुळे अव्हेलेबिलीटी बायस पक्का होत जातो. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -


  1. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीसाठी या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स जास्त आकर्षक वाटतात.

  2. कायम बातम्यांमध्ये असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांमध्येही लोकप्रिय असतात. 

  3. जी म्युच्युअल फंड कंपनी भरपूर जाहिरात करते, त्यांचे म्युच्युअल फंड्स लोकांना जास्त विश्वसनीय वाटतात. 


एखाद्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असताना आपल्याकडे जी ताजी माहिती आहे किंवा आपल्याला जी माहिती सोयीची वाटते त्यावरच भिस्त ठेवणे म्हणजे अर्धवट माहिती घेऊन निर्णय घेणे या पूर्वग्रहात होत असते. 


सामान्य गुंतवणुकदार या अव्हेलाबिलीटी बायस ला संस्थागत बड्या गुंतवणुकदारांपेक्षा जास्त बळी पडतो. संस्थागत लोकांकडे गुंतवणूक करण्यासाठी तज्ञ विश्लेषक, अनेक वर्ष सतत प्रगत होत गेलेल्या सिस्टीम आणि प्रोसेस असतात. कुठलाही शेअर का खरेदी केला आणि का विकला याबाबत सखोल अभ्यास करून ते निर्णय घेत असतात. विविध चेकलिस्ट आणि फ्लो चार्ट्स चा वापर करून त्यांचे शेअर गुंतवणुकीचे निर्णय होत असतात. या उलट सामान्य गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करताना कुठल्याही गावगप्पांना बळी पडतो. याची 2 उदाहरणे पुढीलप्रमाणे - 


  1. कंपनीचे नाव आणि दिशाभूल -

  • कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडरचा प्रचंड तुटवडा होता. जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या भावात सिलेंडर विकत घ्यायची लोकांची तयारी होती. 

    • बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड नावाची शेअर बाजारात नोंदीत कंपनी कोणत्याही ऑक्सिजनचे उत्पादन करत नाही, परंतु कंपनीच्या नावात ‘ऑक्सिजन’ असल्यामुळे डिसेंबर 2020 पासून कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास 200 टक्क्यांनी वाढली होती. 29 जानेवारी 2021 रोजी ₹ 9,573 किंमत असणारा कंपनीचा एक शेअर 16 एप्रिल 2021 रोजी ₹ 23,404 पर्यंत वाढला. मात्र पुढच्या 2-3 महिन्यातच हा शेअर ₹ 10,000 पेक्षाही कमी किमतीला जाऊन टेकला होता. 

  • लक्षात घ्या, केवळ नावात ऑक्सिजन आहे म्हणून प्रत्यक्षात वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीत लोकांनी का पैसे टाकले आणि गमावले? अव्हेलेबिलीटी बायस मुळे 'ऑक्सिजनची कमतरता' या आपल्याला ज्ञात असलेल्या अर्धवट माहितीच्या आधारे कमी काळात पैसे कमवण्याच्या लालचेपोटी घाई-गडबडीत केलेल्या गुंतवणुकीमुळे शेवटी त्यांचे  नुकसानच झाले.



  1. पंप अँड डंप स्कीम - 

  • मार्च 2023 मध्ये सेबीने अर्षद वारसी, त्याची पत्नी व इतर 55 लोकांवर शेअर बाजारात ₹54 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर नफा वसुलीसाठी कारवाई केली. अतिरंजित खोटी माहिती देऊन लोकांना कसे फसवले हे आपण समजून घेऊया. 

  • साधना ब्रॉडकास्ट आणि शार्प लाईन ब्रॉडकास्ट या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्या म्हणून जोरदार जाहिरात मोहीम राबवली गेली.  मनी वाईज, द ॲडव्हायजर, मिडकॅप कॉल्स, प्रॉफिट यात्रा या यूट्यूब चॅनल्सने खोटी व दिशाभूल करणाऱ्या माहितीचे व्हिडिओ या 2 कंपन्यांबाबत प्रसिद्ध केले. 

  • लाखो सबस्क्रायबर्स असणारे चॅनल योग्य तोच सल्ला देत असणार, नफा मिळवायची  सुवर्णसंधी हातातून जाईल असा विचार अव्हेलेबिलीटी बायस मुळे  करून झटपट नफा मिळविण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी त्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायला सुरुवात केली. 

  • प्रचंड मागणीमुळे शेअर्सचे भाव वाढले आणि फ्रॉड करणाऱ्यांनी  त्यांच्याकडचे शेअर्स विकले. शेअरचे भाव पडल्यावर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मोठे  नुकसान झाले. सेबी कडे तक्रार दाखल झाल्यावर तपासाअंती त्यांनी गुन्हेगारांवर कारवाई केली. 


अव्हेलाबिलीटी बायस कसा टाळाल ? 


  1. सेकंड ओपिनियन घ्या. मोठे आर्थिक निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्या. गरज भासल्यास तो सल्ला दुसऱ्या तोला-मोलाच्या तज्ञांकडून पारखून घ्या. या सेकंड ओपिनियनची किंमत संभाव्य नुकसानीच्या आकड्यापेक्षा नगण्य असते. 

  2. विरोधी मतांचा आदर करायची सवय लावा. इतरांची मते विचारात घ्या. तुमच्या निर्णयात इतरांनी दाखवलेल्या चुका व्यक्तिगतरित्या न घेता त्या विशिष्ट विषयापुरत्याच मर्यादित ठेवा.  

  3. गुंतवणुक पोर्ट फोलिओचा सतत मागोवा घेणे टाळा. अभ्यासपूर्वक दीर्घकाळाचा विचार करून तुम्ही गुंतवणूक केली असेल तर एखाद्या तात्कालिक गोष्टीमुळे तुम्ही गुंतवणूक केलेला शेअर खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीला व्यवहार करत असेल तर घाबरून जाऊ नका. 

  4. माहितीची समीक्षा करा. माहिती व ज्ञान यातील फरक ओळखा. मला मिळालेली माहिती अर्धवट असू शकते किंवा दिशाभूल करणारी असू शकते किंवा त्यात आताच्या परिस्थितीत काही बदल झाला असू शकतो, असा विचार करायची सवय लावा. 

  5. माझा आर्थिक निर्णय का चुकीचा ठरू शकतो? आणि तसा तो चुकलाच तर पर्यायी योजना काय असू शकते याचा विचार नेहमी करा.  


(सीए अभिजीत कोळपकर - “अर्थसाक्षर व्हा!” या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आहेत)